२६/११ च्या वीर शहीदांना अभिवादन करण्यासाठी सांगलीतून ‘शहीद दौड’चा एल्गार; सहा दिवसांत मुंबई गाठणार ; पोलीस अधीक्षक तुषार दोषी व समित (दादा) कदम यांच्या हस्ते दौडला हिरवा झेंडा
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीस अधिकारी आणि जवानांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी सांगलीतून ४७० किलोमीटरच्या ‘शहीद दौड’ला उत्साहात प्रारंभ झाला. हातात मशाल, खांद्यावर राष्ट्रध्वज आणि मनात शहीदांप्रती कृतज्ञतेची भावना घेऊन १२ धावपटू मुंबईच्या दिशेने रवाना झाले. पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि शहीद इंटरनॅशनलचे चेअरमन समित (दादा) कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या दौडचा शुभारंभ करण्यात आला.
२६ नोव्हेंबर २००८ मुंबईच्या भूमीवर दहशतवाद्यांनी रक्ताचा थरकाप उडवला होता. मात्र, या संकटासमोर मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांनी शौर्याची भिंत उभी केली. देशासाठी हसत हसत प्राण अर्पण करणाऱ्या त्या वीरांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी शहीद इंटरनॅशनल संस्थेने पुढाकार घेतला आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा २१ ते २६ नोव्हेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

४७० किलोमीटरचा प्रवास; सहा दिवसांचा निर्धार
सांगली ते मुंबई असा तब्बल ४७० किलोमीटरचा प्रवास १२ धावपटू सहा दिवसांत पूर्ण करणार आहेत. सांगली, तासगाव, विटा, पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई, चेंबूर आणि माटुंगा मार्गे ही दौड मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचणार आहे.
१२ धावपटूंच्या पावलांतून शहीदांना सलाम
या दौडमध्ये पंढरीनाथ मारुती वडर, सुशांत बंडू मोरे, प्रसाद निवृत्ती कारंडे, आयुष कुमार चोरमले, आदर्श अजित अकिवाटे, जय अनिल महापुरे, सक्षम कुमार हिरवे, आर्यन मारुती मोरे, स्वप्नील माने, आदित्य लोखंडे, जयदीप घारगे आणि प्रतीक नलवडे हे १२ धावपटू सहभागी झाले आहेत.
राष्ट्रभक्तीचा संदेश; आयोजनासाठी मान्यवरांचे परिश्रम
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील (जत), मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित कुमार पाटील, डॉ. रियाज मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे, घनश्याम उके, संभाजी लोखंडे, ललित छाजेड, इनायत तेरदाळकर, देवदास चव्हाण, पै. अभिजीत पाटील, संतोष जाधव, निलेश मिसाळ, अभिजीत भोईटे, सचिन खोंद्रे, दिलीप रोकडे, नाना शिंदे, स्वप्नील माने, जयदीप घारगे, आदित्य लोखंडे, प्रतीक नलवडे, नितीन कदम, सुधीर भगत, अमित सोनवणे आणि हिना पठाण परिश्रम घेत आहेत.
ही केवळ धावण्याची स्पर्धा नाही, तर देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मृतींना वाहिलेली कृतज्ञतेची मानवंदना आहे. प्रत्येक पाऊल शौर्याची आठवण करून देणारे, प्रत्येक किलोमीटर राष्ट्रभक्तीची जाणीव जागवणारे आणि प्रत्येक मशाल बलिदानाची ज्योत प्रज्वलित ठेवणारी आहे. शहीदांचे बलिदान विसरले जाणार नाही, हा संदेश घेऊन सांगलीची ‘शहीद दौड’ मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.

