रघुनाथदादा पाटील यांचा साखर कारखानदारांना सज्जड इशारा; सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी साखरेचे ट्रक अडवले, उद्यापासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

LIVE NEWS | UPDATE

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ७,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिनाभरापासून संघर्ष सुरू आहे. मात्र, वारंवार निवेदने देऊनही साखर कारखानदारांकडून दराबाबत कोणतीही ठोस भूमिका अथवा चर्चा पुढे न आल्याने शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या साखर कारखानदारांना तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

या आंदोलनाची सुरुवात दि. १८ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकाऱ्यांना पहिले निवेदन देऊन करण्यात आली होती. त्यानंतर महिनाभर प्रतीक्षा करूनही ऊसदराच्या मागणीसंदर्भात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना निवेदने देण्यात आली. या निवेदनात ऊसाला प्रतिटन ७,५०० रुपये दर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास साखर कारखान्यांतून साखर तसेच इतर उपपदार्थांची वाहतूक होऊ दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.

मात्र, कारखानदारांनी या मागणीबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने पत्रकार परिषदेत रघुनाथदादा पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ऊसाला मागणीप्रमाणे दर जाहीर न झाल्यास साखरेची वाहतूक करणाऱ्या ट्रकना लक्ष्य करून ते पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. या आक्रमक भूमिकेनंतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून साखर व बगॅस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली.

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक रोखली

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगाव तालुक्यातील तुरची फाटा, येळावी फाटा आणि पाचवा मैल या परिसरात साखरेचे तसेच बगॅस वाहतूक करणारे ट्रक अडवण्यात आले. त्याचबरोबर वांगी येथेही साखरेचे ट्रक रोखण्यात आले. कुंडल फाटा परिसरातही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून वाहनांमधील हवा सोडण्याचा प्रयत्न करून आंदोलनाची तीव्रता दाखवून दिली.

यावेळी साखर व बगॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालक-मालकांना आंदोलनाची भूमिका समजावून सांगण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य दराच्या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

विविध सामाजिक व राजकीय संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

या ऊसदर आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट), वंचित बहुजन आघाडी, जनता क्रांती दल, महाराष्ट्र किसान सभा तसेच कम्युनिस्ट पक्षासह विविध दलित, सामाजिक व राजकीय संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नासाठी विविध संघटनांनी एकत्र येत आंदोलनाला बळ दिल्याने या लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.

कारखानदार व ट्रान्सपोर्ट कंपन्यांना सहकार्याचे आवाहन

शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर गट) चे सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांनी रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. ऊसाला प्रतिटन ७,५०० रुपये दर जाहीर न झाल्यास साखर व इतर उपपदार्थांच्या वाहतुकीविरोधातील आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परशुराम माळी यांनी सर्व साखर कारखानदार आणि साखर वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना आपली वाहने थांबवून आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. महिनाभरापासून निवेदने, पाठपुरावा आणि आंदोलन करूनही कारखानदारांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आता संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे शेतकरी संघटनेने स्पष्ट केले आहे.