अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी तिन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी होती ; भाजप कमी पडल्याचीही कबुली
LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचा प्रतिनिधी असायला हवा होता, अशी अपेक्षा होती. जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्यात आली असल्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळीही महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही, अशी नाराजी माजी खासदार तथा जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
 जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. निंबाळकर म्हणाले की, जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय झाला होता. सर्वांनी एकत्र बसून जागावाटप केले होते. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतानाही तिन्ही पक्षांनी एकत्रित चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही अशीच अपेक्षा होती.
 मी भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला अध्यक्षपदाची संधी मिळायला हवी होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील सर्व अधिकार पक्षाने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले होते. याबाबत त्यांची मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा झाली, याची मला किंवा मंत्री जयकुमार गोरे यांना माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 ‘भाजप म्हणून आम्ही निवडणुकीत कमी पडलो
 जिल्हा बँकेत भाजपचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष झाला नाही, याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारली पाहिजे. भाजप म्हणून आम्ही या निवडणुकीत कमी पडलो. फलटणची जागा जिंकता आली नाही, तसेच खंडाळ्यातही यश मिळाले नाही. त्यामुळे एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे स्पष्ट मत निंबाळकर यांनी मांडले.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणूनच जिल्हा बँकेची निवडणूक लढवावी, स्वतंत्र पॅनेल उभे करू नये, अशा सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामार्फत दिल्या होत्या. महायुतीने एकत्रितपणे निवडणूक लढविली असेल, तर आता त्याचा वचपा काढला, अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नाही. सर्वांनी एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते, असेही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
 जिल्हा बँकेच्या सत्तावाटपावरून महायुतीतील भाजपच्या भूमिकेबाबत निंबाळकर यांनी व्यक्त केलेली नाराजी आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.