भाळवणीत प्रचंड पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू; काही शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मोजणी होऊ देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून सांगली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध अद्याप कायम असून, मोजणी प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला विरोध केला. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे जमीन मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शक्तिपीठ महामार्गासाठी प्रशासनाकडून जमीन मोजणीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र, या महामार्गामुळे आपल्या जमिनी जाणार असल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शविला आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रिया रोखून धरल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून प्रशासनाकडून मोजणी प्रक्रिया राबविण्यात येत होती. मात्र, शेतकऱ्यांनी एकत्र येत या प्रक्रियेला विरोध केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मोजणी प्रक्रिया बंद पाडली आहे. प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्ताच्या जोरावर मोजणी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी शेतकरी माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. "काहीही झाले तरी जमीन मोजणी होऊ देणार नाही," असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.