LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांकरिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यातील इच्छुक खेळाडू आणि क्रीडा मार्गदर्शकांनी १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी केले आहे.


क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे, तसेच क्रीडा संस्कृतीच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ क्रीडापटू, मार्गदर्शक आणि व्यक्तींचा गौरव करणे, हा या पुरस्कारांचा उद्देश आहे. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) आणि महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार यांचा समावेश आहे.


विविध पुरस्कारांचे स्वरूप

क्रीडा क्षेत्रात खेळाडू, संघटक किंवा प्रशासक म्हणून दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, तर महिला प्रशिक्षकांना जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व पुरुष खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच दिव्यांग खेळाडू आणि जल, जमीन व आकाश या क्षेत्रांतील साहसी उपक्रमांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र पुरस्कार आहेत.


नियमावलीनुसार अर्जांचे मूल्यमापन

शासनाच्या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली, २०२३’ नुसार पुरस्कारांसाठी अर्जांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. अधिकृत मान्यताप्राप्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरी, पदकांची संख्या आणि प्राप्त गुण यांच्या आधारे अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज भरल्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम आणि विभागीय क्रीडा उपसंचालक, अमरावती यांच्या कार्यालयामार्फत कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर अर्ज अंतिम निवडीसाठी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सादर केले जातील. राज्यस्तरीय समितीमार्फत अंतिम निवड करण्यात येईल.


अर्जाबाबत महत्त्वाच्या सूचना

अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. हस्तलिखित, टंकलिखित किंवा ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे इच्छुक खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयातील क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे (मो. ९८८१०७१७७०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण यांनी केले आहे.