जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविणे, वैरण बियाण्यांचे वाटप, वनक्षेत्रात चारा लागवड तसेच आवश्यकतेनुसार चारा डेपो व चारा छावण्यांच्या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा चाराटंचाई नियोजन आढावा सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सहायक वनसंरक्षक मंठावार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ८९५ पशुधन
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी सादर केलेल्या नियोजनानुसार, २१ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ८९५ पशुधन असून, सप्टेंबर २०२६ अखेर १३ लाख २९ हजार १३८ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा साठा एप्रिल ते मे महिन्यापर्यंत पुरेल, असे नियोजन आहे. चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यावर भर
रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी वैरण बियाणे पुरविण्याकरिता १ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पातून २० लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे. सिंचनाची जमीन व पुरेसा पाणीसाठा असलेल्या ६४४ शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
चालू २०२६-२७ वर्षात ५१.७ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, १ हजार ८१४ लाभार्थ्यांना १३ हजार ४४८ किलो वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यातून ७२५ हेक्टर क्षेत्रावर चारा लागवड आणि २४ हजार ६६४ मेट्रिक टन चारा उत्पादन अपेक्षित आहे. रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढविण्यासाठी उपलब्ध योजनांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वनक्षेत्रात चारा लागवडीवर भर
ई-क्लास जमिनीवर व्हीबी-जी रामजी योजनेअंतर्गत चारा लागवडीसाठी पशुसंवर्धन विभागाने प्रस्ताव सादर करावेत. तसेच वन विभागाने कुरण क्षेत्रातील चारा पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
चारा उत्पादन व साठवणुकीसाठी विविध उपाययोजना
ज्वारी व बाजरीसारख्या कमी पावसात वाढणाऱ्या चारा पिकांची लागवड, कुटाराची योग्य साठवणूक व प्रक्रिया आणि चारा साक्षरता अभियान २०२६ राबविण्यावरही भर देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार चारा डेपो व छावण्यांच्या माध्यमातून पशुधनाला चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या सभेला सर्व पशुधन विकास अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

