दुर्घटनेप्रकरणी गांधी चौकी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अज्ञातांवर गुन्हा दाखल करून जबाबदारीचा प्रश्न संपत नाही तर स्वागत कमानीच्या बांधकामाची जबाबदारी असलेले ठेकेदार खराडे आणि कामावर देखरेख ठेवणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) अधिकारी व अभियंते यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
ठेकेदाराचा परवाना रद्द करा ; काळ्या यादीत टाका
स्वागत कमानीच्या बांधकामात गुणवत्तेच्या निकषांचे पालन झाले होते का? सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाले का? कामाच्या देखरेखीत कसूर झाली का? या प्रश्नांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी RPI पक्षाने केली आहे. चौकशीत दोषी आढळल्यास ठेकेदार खराडे यांचा परवाना रद्द करून त्यांचा काळ्या यादीत समावेश करावा. तसेच संबंधित पिडब्लूडी अधिकारी आणि अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करून, पुराव्यांच्या आधारे त्यांना सहआरोपी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी पक्षाची भूमिका आहे.
कामगारांच्या सुरक्षेशी तडजोड का?
शासकीय बांधकामांमध्ये कामगारांच्या जीविताची सुरक्षा सर्वोच्च असली पाहिजे. कमान कोसळून कामगार जखमी होण्याची घटना ही केवळ अपघात म्हणून बाजूला सारता येणार नाही. बांधकामाच्या दर्जाबाबत, देखरेखीबाबत आणि संभाव्य निष्काळजीपणाबाबत तपासातून सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सदर मागण्यांवर ठोस कार्यवाही होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार RPI आठवले पक्षाने व्यक्त केला आहे.
या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष पोपट (नाना) कांबळे, तालुकाध्यक्ष अरविंद (बापू) कांबळे, युवक जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील खांडेकर, युवक मिरज शहराध्यक्ष अमित वाघमारे यांच्यासह पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

