LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्गावरील नामफलकाची दुरुस्ती आणि परिसराचे सुशोभीकरण तातडीने करावे, अन्यथा सोमवारपासून महानगरपालिकेच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ‘आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना, सांगली जिल्हा’ यांच्यावतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या उपआयुक्त स्मृती पाटील यांची भेट घेऊन मागण्यांकडे लक्ष वेधले.
मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाशेजारील अण्णाभाऊ साठे मार्गाचा नामफलक जीर्ण अवस्थेत असून, त्यावरील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. नामफलकाचे नूतनीकरण करून परिसराचे सुशोभीकरण करावे, या मागणीसाठी संघटनेने २४ सप्टेंबर २०२६ रोजी महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानंतर संबंधित ठिकाणाची स्वच्छता करण्यात आली मात्र, नामफलकाची दुरुस्ती आणि सुशोभीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.
या प्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपआयुक्त स्मृती पाटील यांची भेट घेतली. तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी मदने यांच्याशी चर्चा केली. नामफलक बसविण्याबाबत सोमवारपर्यंत कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता गजानन सुतार यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत नामफलकाची पाहणी केली. येत्या आठ दिवसांत नामफलकाचे नूतनीकरण आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या मार्गाच्या नामफलकाची दुरवस्था दूर करून त्यांना सन्मानजनक स्वरूप द्यावे, अशी संघटनेची भूमिका आहे. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न केल्यास सोमवारपासून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी तुषार खांडेकर, विश्वासबापू खांडेकर, सागर आवळे, अरविंद कुरणे, उमेश धेंडे, आकाश कांबळे, आकाश सादरे, सचिन मोरे, कपिल कबाडगे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, धनराज कांबळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

