कॉल रेकॉर्डिंगच्या नावाखाली ब्लॅकमेल केल्याची तक्रार; पीडितेला गर्भवती केल्याचाही आरोप
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातून अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग कुटुंबीयांना ऐकविण्याची धमकी देऊन मुलीला ब्लॅकमेल केल्याचा, तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आणि तिला गर्भवती केल्याचा आरोप एका ४५ वर्षीय किराणा दुकानदारावर करण्यात आला आहे. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपी प्रफुल साखरकर याचे कारंजा शहरातील टिळक चौक परिसरातील उपाध्याय एन्क्लेव्ह येथे किराणा दुकान आहे. पीडित मुलीशी असलेल्या परिचयाचा फायदा घेत आरोपीने तिला दुकानात बोलावले. तिच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे असल्याचे सांगून ते तिच्या कुटुंबीयांना ऐकविण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या धमकीचा वापर करून मुलीवर दबाव टाकण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


एप्रिल २०२३ ते जून २०२६ दरम्यान अत्याचार केल्याचा आरोप

तक्रारीनुसार, एप्रिल २०२३ ते जून २०२६ या कालावधीत आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्यावर तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केले. आरोपीने स्वतःच्या घरी तसेच किराणा दुकानात बोलावून हे कृत्य केल्याचा आरोप आहे. या कथित अत्याचारांमुळे पीडितेला गर्भधारणा झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितेला संरक्षण, समुपदेशन आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळणे महत्त्वाचे ठरते.


पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी कारंजा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एल), ६४(२)(एम), ३५१(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा अर्थात पॉक्सोच्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.