शेतकऱ्यांनी मुरूम टाकून रस्ता अडवल्याने शाळकरी मुले, ऊस वाहतूक आणि मेंढ्यांचा कळप अडकला; तहसीलदार अर्पणा धुमाळ-मोरे व मंडळाधिकारी परशुराम ओमासे यांच्या प्रयत्नांना यश
LIVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
रस्ता अडवून सर्वसामान्यांची कोंडी करण्याचा प्रकार खटावमध्ये उघडकीस आला असून, अखेर तहसील प्रशासनाच्या हस्तक्षेपाने पानंद रस्ता खुला करण्यात आला. मिरज तालुक्यातील खटाव येथील नवनाल रस्ता ते कारखाना रोडदरम्यान असलेल्या पानंद रस्त्यावर रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनांद्वारे मुरूम टाकून मार्ग बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली. यामुळे शेतकरी, शाळकरी मुले, ऊस वाहतूक आणि मेंढपाळांची गैरसोय झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार अर्पणा धुमाळ-मोरे, मंडळाधिकारी परशुराम ओमासे आणि स्थानिक लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या मध्यस्थीने रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, खटाव येथील नवनाल रस्ता ते कारखाना रोड या पानंद रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी मुरूम टाकून मार्ग अडवल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांसह शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना अडचणींचा सामना करावा लागला. ऊसतोडणी झालेल्या सुमारे ५० टन उसाच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला, तर जवळपास ५०० मेंढ्यांचा कळपही अडकल्याची माहिती देण्यात आली.

या प्रकाराची तक्रार तहसीलदार, मंडळाधिकारी आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत मंडळाधिकारी परशुराम ओमासे आणि सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या मध्यस्थीने संबंधित शेतकऱ्यांना बोलावून समज दिली. त्यानंतर रस्त्यावरील मुरूम हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पुन्हा रस्ता अडवल्यास फौजदारी कारवाईचा इशारा*
पानंद रस्ते हे शेतकरी, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन ये-जा तसेच शेतीच्या कामांसाठी महत्त्वाचे असतात. अशा रस्त्यांवर अडथळे निर्माण झाल्यास अनेकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे पानंद रस्ता अडवल्यास संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा मिरज तहसील प्रशासनाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी मंडळाधिकारी परशुराम ओमासे, सरपंच रावसाहेब बेडगे, ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

