LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील धक्कादायक घटना; सहा दिवसांनंतर हत्येचे बिंग फुटले


ज्या बापाच्या छायेखाली मुलीने सुरक्षित आयुष्य जगावे, त्याच बापाने तिचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे उघडकीस आली आहे. समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून पित्यानेच आपल्या ३५ वर्षीय विवाहित मुलीचा शेल्याने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. २० ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेचे गूढ तब्बल सहा दिवसांनी, २६ ऑक्टोबरला उकलले. मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बदनामीच्या रागातून टोकाचे पाऊल?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा उमेश नायकवाल (वय ३५, मूळ रा. कोरेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली; सध्या रा. ब्राह्मणवाडा) हिचे एका युवकावर प्रेम होते. ती पतीला सोडून त्या युवकासोबत निघून गेली होती. या घटनेमुळे समाजात कुटुंबाची बदनामी होत असल्याचा राग तिचे वडील संतोष मारोती गोटे (वय ५२, रा. ब्राह्मणवाडा) यांच्या मनात होता, असे तपासातील प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.


याच रागातून २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घरातच संतोष गोटे यांनी शेल्याने मनीषाचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. नात्याच्या विश्वासाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सहा दिवसांनी फुटले हत्येचे बिंग

घटनेच्या वेळी मृत महिलेची आई वर्षा संतोष गोटे (वय ४५) उपस्थित होती. मात्र, या प्रकारामुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला कोणालाही घटनेची माहिती दिली नाही. दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संशयाच्या आधारे त्यांच्याकडे चौकशी केली. योग्य संरक्षणाची हमी मिळाल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानंतर या प्रकरणातील हत्येचे गूढ उकलले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

या फिर्यादीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), २३८, ११५(२) आणि ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज करीत आहेत.