LiVE NEWS | UPDATE
ठाणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
शिवसेना नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत पूर्णेकर यांचे कुटुंबीय आणि समर्थक आक्रमक झाले. या मागणीसाठी समर्थकांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर तसेच मानपाडा परिसरात रास्तारोको आणि ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहरातील महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली.
मानपाडा परिसरातील उड्डाणपुलाखाली समर्थकांनी मंगळवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. प्रदीप पूर्णेकर राहत असलेल्या परिसरात झालेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे सहा तास ठप्प झाली. दुसरीकडे, नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी रस्ता अडवून धरला होता. या आंदोलनामुळे हरी निवास सर्कल परिसरातील वाहतूक सुमारे १६ तास प्रभावित झाली.
आंदोलकांना रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मात्र, आंदोलकांनी माघार न घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर काही आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली तसेच काचेच्या बाटल्या फेकल्या आणि जाळपोळ केल्याचे सांगण्यात आले. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले.
घटनेनंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच महामार्गावरील परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी मार्गावरील ताबा मिळवल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मानपाडा उड्डाणपुलाखाली पहाटेपर्यंत आंदोलन सुरू असल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही समर्थकांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी नौपाडा पोलीस ठाण्याबाहेर सुरू असलेले आंदोलन सुमारे १६ तासांनंतर स्थगित करण्यात आले. मात्र, या प्रकरणामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
सध्या ठाण्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती असून, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.