वाशिम जिल्ह्यात ज्वारीची पेरणीच नाही; शेतशिवारातून ज्वारीची पिके गायब, ग्रामीण खाद्यसंस्कृतीवर संकटाचे सावट
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
हिवाळा सुरू झाला की ग्रामीण भागातील सर्वांना वेध लागायचे ते हिरव्यागार ज्वारीच्या कणसांपासून तयार होणाऱ्या खमंग हुरड्याचे! शेताच्या बांधावर पेटलेली शेकोटी, त्यावर भाजली जाणारी हिरवीगार ज्वारीची कणसे, सोबत शेंगदाण्याची चटणी, दही, लसूण आणि मित्रपरिवारासोबत रंगणाऱ्या गप्पा... हे चित्र काही वर्षांपूर्वी हिवाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागात सहज पाहायला मिळत होते. मात्र, यंदा हे चित्रच दुर्मिळ झाले असून, हिवाळ्यातील हुरड्याची परंपरा जणू इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे.
यंदा अनेक भागांत ज्वारीची पेरणीच झालेली नसल्याने शेतशिवारात ज्वारीची हिरवीगार पिके दिसेनाशी झाली आहेत. परिणामी, हुरड्याच्या हंगामातही तो उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे. एकेकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर हुरड्याच्या पार्ट्या रंगायच्या; मात्र आता ज्वारीचे पीकच नसल्याने हुरड्याचा आस्वाद घेण्याची संधीही हिरावली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल, पावसाचे अनियमित प्रमाण, पेरणीच्या काळातील प्रतिकूल परिस्थिती आणि वाढता शेतीखर्च यामुळे शेतकरी पारंपरिक पिकांपासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ज्वारीचे उत्पादन तुलनेने कमी आर्थिक परतावा देत असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन, कापूस आणि इतर नगदी पिकांकडे वळले आहेत. यंदाच्या अवर्षणसदृश परिस्थितीने या संकटात आणखी भर घातली आहे.
विशेषतः ज्वारीच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा उपलब्ध न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी टाळली. परिणामी, हिवाळ्यात शेतात डोलणारी ज्वारीची हिरवीगार कणसेच दिसेनाशी झाली आहेत.
हुरडा केवळ खाद्यपदार्थ नव्हे, तर ग्रामीण संस्कृतीचा ठेवा
हुरडा म्हणजे केवळ एक खाद्यपदार्थ नाही, तर ग्रामीण जीवनातील आनंदाचा आणि आपुलकीचा उत्सव आहे. शेतात कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येऊन हुरडा भाजण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. शेतातील मोकळे वातावरण, चुलीवर भाजलेला हुरडा आणि त्यासोबतचा सामूहिक आनंद याला वेगळीच चव होती.
हुरड्याच्या निमित्ताने शेतशिवारात होणारी गर्दी, लहान मुलांचा उत्साह आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले क्षण ही ग्रामीण संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. मात्र, बदलती पीकपद्धती, पाण्याचे संकट आणि ज्वारीच्या लागवडीतील घट यामुळे ही परंपरा हळूहळू लोप पावत आहे.
पुढील पिढीला हुरडा केवळ आठवणीतच राहणार?
आजच्या पिढीतील अनेक मुलांना शेतात जाऊन ज्वारीचे कणीस भाजण्याचा अनुभव मिळणेही कठीण झाले आहे. एकेकाळी हिवाळ्याची चाहूल लागताच हुरड्याच्या पार्ट्यांचे नियोजन करणारे शेतकरी आज ज्वारीचे पीकच नसल्याने हतबल झाले आहेत. ग्रामीण भागातील ही बदलती परिस्थिती केवळ एका पिकाच्या घटण्याची बाब नसून, शेतीशी जोडलेल्या खाद्यसंस्कृती आणि परंपरांच्या अस्तित्वाचाही प्रश्न बनली आहे.
शेतीतील बदल अपरिहार्य असले तरी ज्वारीसारख्या पारंपरिक पिकांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित करण्याची गरज आहे. कमी होत चाललेली ज्वारीची लागवड, पाण्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक परतावा यावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
अन्यथा, एकेकाळी हिवाळ्याची ओळख असलेला ज्वारीचा हुरडा पुढील पिढ्यांसाठी केवळ आजी-आजोबांच्या आठवणींमधील खाद्यपदार्थ ठरेल. शेतात ज्वारीच नसेल, तर हुरडा कुठून येणार? हा प्रश्न यंदाच्या हिवाळ्यात ग्रामीण भागाला अस्वस्थ करणारा ठरत आहे.

