मोटारपंप, विद्युत केबल, स्टार्टर आणि पाइप जप्त; अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांना प्रशासनाचा दणका
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरुळपीर तालुक्यातील मौजे नांदखेडा येथे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी नांदखेडा धरणातून अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली. धरणातील पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासणी केली. यावेळी अवैध पाणी उपशासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान मोटारपंप, विद्युत केबल, मोटर स्टार्टर आणि पाइप आदी साहित्य जप्त करण्यात आले.
या संयुक्त कारवाईत नायब तहसीलदार सातंगे, जलसंधारण अधिकारी हितेश कसंबे, मंडळ अधिकारी मोहन श्रावणे, ग्रामपंचायत अधिकारी बालाजी सोनटक्के, महावितरणचे शाखा अभियंता टिकर, मुक्तेवार, ग्राम महसूल अधिकारी नीलखन, बीट अंमलदार क्षीरसागर, लाइनमन आंधळे, गोपाल जायभाये, भास्करराव जायभाये, नारायण घुगे, अकील शेख यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

धरणातील पाणीसाठ्याचे संरक्षण, पाण्याचा योग्य वापर आणि अवैध पाणी उपशाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईमुळे अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. धरणातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवैध पाणी उपसा रोखणे ही सामूहिक जबाबदारी असून, जलसंपत्तीचे संरक्षण आणि पाण्याचे योग्य नियोजन ही काळाची गरज आहे, असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.