शहरातील एकल महिलांची अचूक माहिती संकलित करण्यावर भर; सर्वेक्षणातून भविष्यात कल्याणकारी योजनांना मिळणार दिशा
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मंगरूळपीर नगरपरिषद क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले असून, शहरातील काही भागांतील सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एकल महिलांची माहिती अचूक, परिपूर्ण आणि विश्वसनीय स्वरूपात संकलित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
शहरातील तसेच राज्यातील एकल महिलांची वस्तुस्थिती आणि सद्यःस्थिती जाणून घेऊन त्यांच्यासाठी आवश्यक धोरणात्मक निर्णय व विविध कल्याणकारी उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषदा व नगरपंचायतींना एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करून विहित नमुन्यात अंतिम माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एकल महिलांसाठी नवीन धोरणात्मक निर्णय घेणे तसेच विविध कल्याणकारी योजना राबविणे अधिक सुलभ होणार आहे.
मंगरूळपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, नगराध्यक्ष अशोकभाऊ परळीकर, उपाध्यक्ष अनिल गावंडे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई चितलांगे, तसेच नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नगरसेवक आणि समाजसेवक यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण सुरू आहे.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी तथा नोडल अधिकारी राहुल भगत, कुलदीप इंजाळकर, नगरपरिषदेचे कर्मचारी, DAY-NULM अभियानातील महिला पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहकार्याने सर्वेक्षणाचे काम पूर्णत्वाकडे नेले जात आहे.
 एकल महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.