LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ नियमितपणे मिळावा, यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेबाहेरील पात्र व्यक्तींनाही विहित निकषांनुसार योजनेत समाविष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

लाभार्थी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग पूर्ण असल्यास त्यांना तात्काळ मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. यामुळे पात्र नागरिकांना अन्नधान्य मिळण्यात अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घेणे अपेक्षित आहे. रोजगार किंवा पाण्याच्या उपलब्धतेसाठी स्थलांतर केलेल्या पात्र नागरिकांनाही ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ सुविधेच्या माध्यमातून अन्नधान्याचा लाभ घेता येतो. त्यामुळे दुष्काळामुळे गाव सोडून इतर ठिकाणी गेलेल्या पात्र कुटुंबांनाही अन्नसुरक्षेचा आधार मिळू शकतो.

दुष्काळाच्या काळात रोजगार, उत्पन्न आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांबरोबरच अन्नधान्याचा प्रश्नही गंभीर बनतो. अशा परिस्थितीत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वेळेत उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पुरवठा व्यवस्थेवर नियमित लक्ष ठेवून कोणताही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.