मंगरूळपीर शहरातील प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने १० ऑक्टोबर रोजी धडक कारवाई केली. शहरातील महत्त्वाचे चौक, बाजारपेठा आणि प्रमुख रस्त्यांच्या हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाने हातोडा चालविला. या कारवाईमुळे रस्ते मोकळे होण्याचा मार्ग खुला झाला असला, तरी दुसरीकडे हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वीर भगतसिंग चौक, मानोरा रोड, बसस्थानक परिसर ते वाशिम रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते अकोला रोड तसेच कारंजा रोड या प्रमुख मार्गांवर ही कारवाई करण्यात आली. दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नोटिसा बजावल्या, त्यानंतर कारवाईचा बडगा
राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणांबाबत संबंधितांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय महामार्ग (जमीन व वाहतूक) अधिनियम, २००२ मधील कलम २६(२) अंतर्गत नोटिसा दिल्यानंतर प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई केली. या मोहिमेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे अनेक अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
रस्ते मोकळे झाले; पण छोट्या व्यावसायिकांचे काय?
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमणे हटविणे आवश्यक असले, तरी या कारवाईचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. उदरनिर्वाहासाठी रस्त्यालगत व्यवसाय करणाऱ्यांसमोर आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. एका बाजूला वाहतुकीतील अडथळे दूर करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट, तर दुसऱ्या बाजूला लहान व्यावसायिकांच्या उपजीविकेची चिंता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

