महात्मा गांधी चौक पोलिसांच्या सखोल तपासाला यश; न्यायालयाकडून आरोपी दोषी
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज येथील विनयभंग प्रकरणात महात्मा गांधी चौक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत एक वर्ष सक्त कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अक्षय सागर पाटील (वय २८, रा. शारदानगर, कुपवाड रोड, मिरज) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाचा निकाल १७ ऑक्टोबर २०२६ रोजी लागला.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तपासाबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
नेमके प्रकरण काय?
२८ एप्रिल २०२३ रोजी पीडिता या पायदुखी आणि मानदुखीवरील औषधे घेण्यासाठी मिरज येथील गुरुकुल आयुर्वेदिक दुकानात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी अक्षय सागर पाटील याने पीडितेचा हात धरून तिची छेडछाड केली आणि मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याची तक्रार दाखल झाली होती.
पीडितेच्या तक्रारीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२३ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ आणि ३५४(अ)(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार यांनी केला. त्यांनी सखोल तपास करून निर्धारित मुदतीत मिरज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने विविध साक्षीदारांची साक्ष नोंदवून उपलब्ध साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्त कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तपास पथकाचे कौतुक
या प्रकरणाच्या तपासात पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस हेडकॉन्स्टेबल पुंडलीक कांबळे यांनी सहकार्य केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सखोल तपास करून दोषींना शिक्षा होण्यासाठी प्रभावीपणे न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यावर सांगली पोलिसांनी भर दिला आहे.

