‘उद्ध्वस्त करतो’ ही कोणती भाषा? हिंमत असेल तर निवडणुकीच्या रिंगणात उतरा; सतेज पाटलांचे खुले आव्हान, राजकीय संघर्षाला नवे वळण

LiVE NEWS | UPDATE
कोल्हापूर | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

कोल्हापूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोळे वटारले तर तुमचे साम्राज्य उद्ध्वस्त होईल,’ असा इशारा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सरकारी पदाचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून धमक्या देण्याची भाषा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. मी तर अशी भाषा अजिबात खपवून घेणार नाही, अशा रोखठोक शब्दांत सतेज पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला.

धमक्या देण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात उतरून ताकद दाखवा. लोकसभा असो किंवा विधानसभा, जिथून लढायचे आहे तिथून निवडणूक लढवा, असे खुले आव्हान सतेज पाटलांनी दिले. आव्हान द्यायचे असेल तर ते स्वतःच्या कर्तृत्वावर द्यावे. सरकारी पदाचा वापर करून आव्हान देणे म्हणजे मर्दुमकी नव्हे, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘उद्ध्वस्त करतो’ ही महाराष्ट्राची भाषा आहे का?

स्वर्गीय डी. वाय. पाटील यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान अपेक्षित नव्हते. त्यांनी असे विधान करण्यामागचे कारण स्पष्ट करावे. ‘उद्ध्वस्त करतो’ ही कोणती भाषा? ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे का? असा सवाल सतेज पाटलांनी उपस्थित केला. डी. वाय. पाटील स्कूटरवरून फिरत होते, तर आज एवढी संपत्ती कुठून आली, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला होता. त्यावरही सतेज पाटलांनी आक्षेप घेतला.

वाद आमच्या खांद्यावर ढकलण्याचा प्रयत्न

सभांमधील भाषणांचा संदर्भ देताना सतेज पाटील म्हणाले की, आपण, जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांनी कुठेही चुकीचे वक्तव्य केलेले नाही. हसन मुश्रीफ यांनी त्याच रस्त्यावर उसाला दर दिल्याबद्दल त्यांचे पोस्टर लावले होते. मात्र, विनाकारण वाद नको म्हणून पोलिसांनीच ते पोस्टर उतरवले. आमच्याकडून कोणताही अनुद्गार काढण्यात आला नव्हता. चंद्रकांत पाटील यांच्या भाषेतील चुकीची जाणीव झाल्यामुळे त्यांनी दोन पावले मागे घेतली असावीत, असेही ते म्हणाले.

सोशल मीडिया कोणाच्याही नियंत्रणात नाही. भाजपकडून जातीवादाची भाषा केली गेली. हसन मुश्रीफ यांच्याबाबत प्रकाश बिलवडे यांनी सहा महिन्यांपूर्वी काय वक्तव्य केले होते, तसेच भाजपच्या यूट्यूबवर काय बोलले गेले, यावर बोलण्याचे धाडस दाखवले जात नाही. त्यामुळे माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोप केले जात आहेत, हे दुर्दैवी आहे. १५ ते २० वर्षे एकत्र काम केल्यानंतरही माझ्याबाबत असे आरोप होत असतील, तर त्यांनी मला ओळखलेच नाही, अशी खंत सतेज पाटलांनी व्यक्त केली.

मतपेटीतून जनतेचा रोष; संघर्ष मोर्चाची आठवण कायम राहणार

निवडणुकीतील मतांच्या आकडेवारीवरूनही सतेज पाटलांनी विरोधकांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला. साडेचार हजार मते असल्याचा दावा केला जात होता; मात्र आमच्या पॅनेलमधील प्रथमच निवडून आलेल्या उमेदवाराला ३४०० मते मिळाली, तर इतर उमेदवारांनाही अडीच हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. या आकडेवारीतून जनतेचा रोष आणि पॅनेलच्या नेतृत्वाबाबतची भूमिका स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

मतांचा अपमान झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. सरकार उद्या आमच्या मतांना किंमत देणार नसेल, तर मतदानाचा अर्थ काय, असा सवाल करत लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. अनधिकृतपणे निवड झाल्यानंतर निरुत्साहाचे वातावरण होते आणि केवळ दाखवण्यासाठी काही गोष्टी करण्यात आल्या. मात्र, आमचा संघर्ष मोर्चा महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या स्मरणात कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

एकीकडे सत्तेच्या ताकदीचा इशारा, तर दुसरीकडे निवडणुकीच्या मैदानात येण्याचे खुले आव्हान कोल्हापूरच्या राजकारणातील हा शाब्दिक संघर्ष आता अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.