एकाच मैदानात दोन नियमांचा बाजार; महापालिकेच्या कारभारावर प्रश्नांचा भडिमार
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज हायस्कूल मैदानावर दिवाळीनिमित्त फटाक्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. मात्र, या स्टॉलच्या मांडणीसाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळे नियम लावले जात असल्याचा आरोप काही स्टॉलधारकांकडून केला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मैदानाच्या वरील बाजूस उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉलना शेजारील दुकानांपासून किंवा स्टॉलपासून कोणतेही अंतर ठेवण्याची अट नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, मैदानाच्या खालच्या बाजूस स्टॉल उभारणाऱ्या व्यावसायिकांना पाच फुटांपर्यंत अंतर ठेवण्याचे बंधन घालण्यात आल्याचा आरोप आहे.
एकाच मैदानावर, एकाच प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या स्टॉलधारकांसाठी वेगवेगळे नियम का? काहींना मोकळीक आणि काहींना अंतराची सक्ती, हा कोणता न्याय? असा सवाल संबंधित स्टॉलधारकांमधून उपस्थित केला जात आहे.
फटाक्यांच्या विक्रीसाठी सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, हे नियम सर्व स्टॉलधारकांना समान पद्धतीने लागू होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सुरक्षिततेच्या नावाखाली काहींवरच निर्बंध लादले जात असतील, तर त्यामागचे नेमके कारण महापालिका प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
दरम्यान, या स्टॉलना परवानगी देताना संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या निकषांचा आधार घेतला? नियमांमध्ये असा फरक का ठेवण्यात आला? याची चौकशी होणार का? तसेच नियमभंग झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की त्यांना अभय दिले जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महापालिकेचे नियम सर्वांसाठी समान आहेत की काही मोजक्यांसाठीच? आता महापालिका प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
