वीज बिले कमी करा, अन्यथा जुने मीटर पुन्हा बसवा’; माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे यांची महावितरणला मागणी
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर सर्वसामान्य वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिलांचा शॉक बसत असल्याच्या तक्रारींनी आता डोके वर काढले आहे. कुणाला १५ हजार, तर कुणाला २० हजार रुपयांपर्यंतची वीज बिले येत असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. घरात दिवे, पंखे आणि मोजकीच उपकरणे असताना हजारो रुपयांची बिले नेमकी कशाच्या आधारावर येतात, असा संतप्त सवाल ग्राहकांकडून उपस्थित होत आहे. या प्रश्नावर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे यांनी महावितरण प्रशासनाला जाब विचारत वीज बिले कमी करा, अन्यथा जुने मीटर पुन्हा बसवा, अशी ठाम मागणी केली आहे.
या संदर्भात ज्योतीताई गणेशपुरे यांनी कारंजा येथील महावितरण कार्यालयाला भेट देऊन उपअभियंत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलांसंबंधीच्या तक्रारी मांडल्या. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वाढीव बिले येत असल्याचा ग्राहकांचा अनुभव असून, या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली.
अनेक ग्राहकांना १५ ते २० हजार रुपयांपर्यंतची बिले येत असल्याचे सांगितले जात आहे. एवढी मोठी रक्कम भरायची कशी, असा प्रश्न कुटुंबांसमोर उभा ठाकला आहे. वीज बिल कमी करण्याची विनंती करूनही चार-पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम कमी होत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. मग सामान्य माणसाने न्याय मागायचा तरी कुणाकडे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शेतकऱ्यांना मदतीपेक्षा बिलांचाच मोठा भार
शासनाकडून शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असताना दुसरीकडे १५ ते २० हजार रुपयांची वीज बिले त्यांच्या माथी मारली जात असतील, तर मदतीचा उपयोग काय? असा सवाल ज्योतीताई गणेशपुरे यांनी उपस्थित केला. शेतीमालाला अपेक्षित भाव नाही, पावसाच्या अनियमिततेमुळे शेती संकटात आहे, शेतमजुरांना पुरेसे काम मिळत नाही आणि सर्वसामान्य कुटुंबांचा घरखर्च भागविणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अवाजवी वीज बिलांचा आर्थिक भार म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सामान्यांच्या घरात कारखाने चालतात काय?
शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरात कारखाने चालतात काय, की हजारो रुपयांची वीज बिले पाठवली जात आहेत? असा संतप्त सवाल गणेशपुरे यांनी उपस्थित केला. वीज ग्राहकांच्या खिशाला परवडणारी व्यवस्था निर्माण करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. केवळ सरकारी योजनांचा गाजावाजा करून चालणार नाही; प्रत्यक्षात नागरिकांना दिलासा मिळणे महत्त्वाचे आहे.
स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेल्या बिलांच्या तक्रारींची तांत्रिक तपासणी करावी, चुकीची किंवा अवाजवी बिले दुरुस्त करावीत आणि ग्राहकांना आर्थिक दिलासा द्यावा. तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार जुने मीटर पुन्हा बसविण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी ज्योतीताई गणेशपुरे यांनी केली आहे. आता महावितरण प्रशासन या मागणीची दखल घेऊन ग्राहकांना दिलासा देणार की वीज बिलांचा हा शॉक असाच सुरू राहणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

