डॉ. दीपक सोनोने यांनी स्वीकारला पदभार; नागरिकांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम परिसरातील सर्वाधिक गावांशी जोडलेले आणि मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असलेल्या आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अखेर नवे वैद्यकीय अधिकारी मिळाले आहेत. शासनाने डॉ. दीपक सोनोने यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे पदभार स्वीकारला.
आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत परिसरातील अनेक गावांचा समावेश असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आरोग्यसेवेवर ताण निर्माण होत होता. रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध वैद्यकीय मनुष्यबळातील तफावत लक्षात घेता, या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.
नागरिकांच्या या मागणीची दखल घेत शासनाने डॉ. दीपक सोनोने यांची नियुक्ती केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. सोनोने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सोनोने म्हणाले, आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा आहे. या परिसरातील जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून, ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर असून, नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा माझा प्रयत्न राहील.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सोनोने यांच्या नियुक्तीचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत होत असून, आता आरोग्यसेवेचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

