LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | मिरज शहरातील शेतकरी चौक परिसरात असलेल्या डोंगे गल्ली येथे धारदार शस्त्राने वार करून एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या रक्तरंजित घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इलाही लालसाब शेख (वय ५०, रा. डोंगे गल्ली, मिरज) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घरगुती वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इलाही शेख हे आपल्या मोटारसायकलवरून शेतकरी चौकाच्या दिशेने डोंगे गल्लीकडे जात होते. याच वेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोराने त्यांना लक्ष्य केले. काही कळण्याच्या आतच हल्लेखोराने त्यांच्यावर धारदार शस्त्राने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या मानेवर आणि डोक्यावर गंभीर वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वारांची तीव्रता इतकी होती की, इलाही शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

भरवस्तीत घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत तसेच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. हल्लेखोर कोण होता, त्याने हल्ला का केला आणि या घटनेमागे नेमके कोणते कारण आहे, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.

घरगुती वाद की अन्य कारण?

प्राथमिक अंदाजानुसार, घरगुती वादातून ही हत्या झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे हत्येमागील नेमके कारण तपासातूनच स्पष्ट होणार आहे. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

दरम्यान, शेतकरी चौक आणि डोंगे गल्लीसारख्या वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरवस्तीत एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या प्रकरणातील हल्लेखोराला पोलिस कधी ताब्यात घेतात आणि हत्येमागील खरे कारण काय, याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे.