म्हैसाळ रोडवरील हॉटेल पुन्हा चर्चेत; कथित जुगाराच्या डावाची पोलिसांकडून पडताळणी होणार का?
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज | काही दिवसांपूर्वी घुंगरांचा छमछमाट आणि आता तीन पानी पिसण्याच्या डावाची चर्चा! म्हैसाळ रोडवरील एका नामांकित हॉटेलची चर्चा पुन्हा एकदा मिरज परिसरात रंगू लागली आहे. पूर्वी याच हॉटेलमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्याचे कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आणि या प्रकाराला ब्रेक लागला. मात्र, आता त्याच ठिकाणी तीन पानी जुगाराचे डाव रंगत असल्याची चर्चा पुढे येत असल्याने पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

घुंगरू थांबले, पत्त्यांचा आवाज सुरू?

महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील नृत्यांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याची गरज असतानाच, मिरजेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या म्हैसाळ रोडवरील या हॉटेलबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे. पूर्वीच्या कारवाईनंतर आता नेमके काय सुरू आहे, याची पडताळणी होणे आवश्यक आहे.

आधी डान्सचा धिंगाणा, आता जुगाराचा फड?

काही महिन्यांपूर्वी याच हॉटेलमध्ये घुंगरांचा छमछमाट सुरू असल्याची चर्चा होती. पोलिसांच्या कारवाईनंतर तो प्रकार थांबल्याचे बोलले जात असतानाच, आता तीन पानी पत्त्यांचा डाव सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. मात्र, या चर्चेत कितपत तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी प्रत्यक्ष तपासणी करून वस्तुस्थिती समोर आणणे गरजेचे आहे.

तीन पानीचा डाव; पोलिसांचे लक्ष कुठे?

जुगारामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडते. मेहनतीच्या कमाईवर पाणी फेरणाऱ्या अशा अवैध प्रकारांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. म्हैसाळ रोडवरील हॉटेलबाबत नागरिकांमध्ये चर्चा होत असेल, तर पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घ्यावी. केवळ कारवाई करून थांबण्याऐवजी अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठीही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

छापा पडणार की चर्चा धुळखात जाणार?

हॉटेलमधील कथित गैरप्रकारांबाबतच्या चर्चेची पोलिसांकडून कसून पडताळणी होणार का? तीन पानी जुगाराचे डाव सुरू असल्याच्या चर्चेत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार का? की पुन्हा काही दिवस चर्चा, त्यानंतर शांतता आणि मग नव्या प्रकाराची चर्चा सुरू होणार?


घुंगरांचा छमछमाट थांबला आता तीन पानी पिसण्याच्या नव्या छंदाची चर्चा रंगू लागली आहे. या चर्चेमागील सत्य बाहेर येणार की हा विषयही चर्चेपुरताच मर्यादित राहणार? म्हैसाळ रोडवरील या जुगाराच्या डावाबाबत पोलिसांची पुढील भूमिका काय असेल, याकडे मिरजकरांचे लक्ष लागले आहे.