मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत प्रशासकीय मान्यतेचा मार्ग मोकळा; ग्रामीण भागातील रस्ते विकासाला मिळणार चालना

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासकामांसाठी ५ कोटी रुपयांची निधी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित केला असून, या निर्णयामुळे मतदारसंघातील शेतरस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन निर्णयानुसार, मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत विविध लोकसभा मतदारसंघांसाठी प्रशासकीय मान्यतेकरिता निधीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून, या मतदारसंघासाठी ५ कोटी रुपयांची निधी मर्यादा मंजूर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणी आजही कच्च्या, खडतर आणि अडचणीच्या रस्त्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था अधिक बिकट होत असल्याने शेतीमालाची वाहतूक, कृषी निविष्ठांची ने-आण तसेच शेतीची दैनंदिन कामे प्रभावित होतात. अशा परिस्थितीत शेत व पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी निधीची तरतूद होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

या शासन निर्णयामुळे संबंधित लोकसभा मतदारसंघातील शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देताना निश्चित केलेल्या निधी मर्यादेचा आधार मिळणार आहे. तसेच संबंधित लोकसभा सदस्यांनी सुचविलेल्या कामांबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बारमाही रस्त्यांची सुविधा पोहोचविणे, शेतीमालाची वाहतूक सुलभ करणे आणि ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत करणे, या दृष्टीने ५ कोटी रुपयांच्या निधी मर्यादेचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, या निधीतून प्रत्यक्षात किती रस्त्यांची कामे मंजूर होतात आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण होतात, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.