दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला नवे नेतृत्व मिळाले आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांना सहकाऱ्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची जबाबदारी आता अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अलिबागचे सुपुत्र असलेले शिंदे आता या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाची धुरा नव्या नेतृत्वाकडे आल्याने पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे. यासंदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.
शनिवारी सकाळी १०.२० च्या सुमारास मुंबईहून दिल्लीला पोहोचलेले ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले. या तिन्ही प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
या अटकेनंतर लगेचच अभिजीत दिपके यांचा २० सेकंदांचा एक व्हिडिओ संदेश समोर आला. “मला, सौरव आणि आशुतोषला अटक करण्यात आली आहे. आतापासून या आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदे सांभाळतील,” असे त्यांनी या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले. हा व्हिडिओ दिपके यांनी ताब्यात असताना रेकॉर्ड केला की तो पूर्वमुद्रित होता, यावर अद्याप पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अजिंक्य शिंदे हे मूळचे महाराष्ट्रातील अलिबागचे रहिवासी आहेत. संगणक शास्त्रातील पदवीधर असलेल्या शिंदे यांनी पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत अनेक वर्षे उच्च पदावर काम केले आहे. अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने प्रभावित होऊन त्यांनी आयटी क्षेत्रातील लाखोंची नोकरी सोडली. २०१६ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पार्टीचा प्रचार सांभाळला होता. त्यानंतर महाराष्ट्रातही त्यांनी ‘आप’साठी काम केले होते. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या स्थापनेपासूनच ते दिपके यांच्यासोबत जोडले गेले. चालू वर्षाच्या जून-जुलै महिन्यात वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’ पेपरफुटीविरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय संघटक म्हणून जबाबदारी पाहत आहेत.
ते पुढे म्हणाले, “लोक जंतर-मंतरवर पोहोचू नयेत म्हणून ट्रेन रोखल्या गेल्या, बस सेवा बंद करण्यात आल्या आणि आंदोलकांना ठिकठिकाणी रोखण्यात आले. सरकारची ही घबराट दर्शवते की आपण निम्मी लढाई जिंकली आहे आणि हा एका नव्या संघर्षाचा श्रीगणेशा आहे.”.
निवडणूक आयोगाच्या ‘स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन’ (SIR) उपक्रमाविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीने शनिवारी जंतर-मंतर येथे निदर्शनांची हाक दिली होती. मात्र, सकाळी मध्य दिल्लीतून जंतर-मंतरच्या दिशेने कूच करणाऱ्या २,००० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य दिल्लीत भारतीय नागरिक सुरक्षा संहित्या (BNS) च्या कलम १६३ अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला अथवा निदर्शनांना परवानगी दिलेली नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

