समान वेतनश्रेणीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती; कर्मचाऱ्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
 समान वेतनश्रेणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगरूळपीर न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन तूर्तास मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून आंदोलनामुळे प्रभावित झालेले न्यायालयीन कामकाज पुन्हा पूर्ववत झाले आहे.
 उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी आणि भत्ते लागू करण्यात यावेत, या प्रमुख मागणीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. संबंधित मागण्यांचा प्रस्ताव मागील सुमारे २० महिन्यांपासून प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. शासन आणि संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.
 या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला होता. पक्षकार, वकील तसेच विविध न्यायालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी तूर्तास संप मागे घेतल्याने न्यायालयीन कामकाज सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
 दरम्यान, संप मागे घेण्यात आला असला तरी कर्मचाऱ्यांच्या समान वेतनश्रेणीसह इतर मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे या मागण्यांवर शासन आणि संबंधित प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे न्यायालयीन कर्मचाऱ्यांसह वकील आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 मागण्यांची पूर्तता होणार की पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.