भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सुरक्षा, आरोग्य, वाहतूक आणि स्वच्छतेच्या उत्तम व्यवस्था करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याच्या प्रक्रियेला आगामी विधिमंडळ अधिवेशनात गती देऊन आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी केली.
विधानभवन येथे महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच बौद्ध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
दादर स्थानकाच्या नामकरणाचा मार्ग मोकळा?
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, यासंदर्भात केंद्र शासनाला पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र, नामकरणाच्या प्रक्रियेसाठी विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार ही प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करून नामकरणाची कार्यवाही पुढे नेण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
इंदू मिल स्मारकासाठी निधीची कमतरता नाही
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी शासन त्याची भरपाई करण्यास तयार आहे. स्मारकाचे उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चैत्यभूमीवर सुरक्षा आणि वाहतुकीचे काटेकोर नियोजन
महापरिनिर्वाण दिनासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मागील वर्षांच्या अनुभवातून समोर आलेल्या त्रुटी दूर कराव्यात. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून सर्व व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.
चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांवर अधिकृतपणे बंदी घालण्याबाबत गृह विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये आणि अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.
वाहतूक व्यवस्थेत ऑटोरिक्षांच्या प्रवेशावर मर्यादा, भाविकांच्या पुढील प्रवासासाठी सुविधा आणि रेल्वे व रस्ते वाहतुकीचे समन्वित नियोजन करण्यावर भर देण्यात आला. तसेच राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता व सुशोभीकरणाची कार्यवाही पुढील पाच ते सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनाचे पावित्र्य राखण्याचे आवाहन
महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य आणि पावित्र्य कायम राखण्यासाठी उत्सवी स्वरूपाचे कार्यक्रम टाळण्यात यावेत. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रपट प्रदर्शन किंवा त्यांच्या विचारांशी सुसंगत उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
चैत्यभूमीवरील व्यवस्थांपासून दादर स्थानकाच्या नामकरणापर्यंत आणि इंदू मिल स्मारकाच्या उर्वरित कामापर्यंत विविध महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.

