घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या संशयित आरोपीचा शोध घेऊन अवघ्या २४ तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात मानोरा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण ६४ हजार ९६० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे मानोरा पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी भास्कर प्रल्हाद मनवर (वय ४५, व्यवसाय शेती, रा. हिवरा बु., ता. मानोरा, जि. वाशिम) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते घराला कुलूप लावून शेतात गेले होते. घराच्या खिडकीमागे चावी ठेवण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये चांदीचे पायातील कडे एक जोड, चांदीच्या तोरड्या तीन जोड, हातातील चांदीच्या पाटल्या एक जोड, सौभाग्याचा पोत, मंगळसूत्र, डोरेले पोत, कानातील टॉप्स, सोन्याच्या बाळ्या तसेच चांदीचा एक हंस अशा एकूण ६४ हजार ९६० रुपये किमतीच्या दागिन्यांचा समावेश होता. याप्रकरणी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मानोरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक तथा ठाणेदार नैना पोहेकर आणि तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वाशिम येथील डॉग स्कॉड, कारंजा येथील फॉरेन्सिक व्हॅन तसेच अंगुलीमुद्रा तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील परिस्थिती आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.
दरम्यान, घटनास्थळ परिसरातील साक्षीदार आणि नागरिकांकडे चौकशी केली असता, फिर्यादीचा पुतण्या विवेक कुमार मनवर (वय २२, रा. हिवरा, ता. मानोरा, जि. वाशिम) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने शेतातील धुऱ्यावर तुराट्यांच्या गंजीजवळ जमिनीत पुरून ठेवल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष दागिने बाहेर काढून जप्त केले.
अशा प्रकारे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत चोरीचा छडा लावून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात मानोरा पोलिसांना यश आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर आणि पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राऊत यांनी ही कारवाई केली. या तपासात पोलीस हवालदार संदीप जाधव, पोलीस हवालदार शेख रियाज, पोलीस अंमलदार आशिष एकांडे, विजय जाधव, रोहन तायडे तसेच वाहनचालक रूपेश नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या एका दिवसात चोरीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केल्याने मानोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

