मंगरुळपीर शहरासह संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आहे. मात्र, ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उपलब्ध असलेले मनुष्यबळ अत्यल्प असल्याचे चित्र समोर येत आहे. मंगरुळपीर पोलिस ठाण्यात केवळ ६३ पोलिस कर्मचारी कार्यरत असून, त्यातीलही अनेक कर्मचारी विविध शासकीय कामकाज, न्यायालयीन कामे, वाहतूक व्यवस्था, बंदोबस्त आणि इतर जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्षात नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असणारे मनुष्यबळ आणखी कमी होते.
पोलिस ठाण्यातील उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन करताना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. सुमारे ८ कर्मचारी न्यायालयीन व इतर कार्यालयीन कामकाजासाठी, ५ कर्मचारी वाहतूक व्यवस्थेसाठी, तर सुमारे १० कर्मचारी विविध बंदोबस्त, बाहेरील कार्यक्रम आणि इतर शासकीय कर्तव्यांसाठी नियुक्त असतात. त्यात कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या तसेच विविध शिफ्टचे नियोजनही करावे लागते.
त्यामुळे पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, भांडणे, वाहतूक समस्या, महिला व नागरिकांच्या सुरक्षेचे प्रश्न, उत्सव काळातील बंदोबस्त आणि अचानक उद्भवणाऱ्या घटनांना तातडीने प्रतिसाद देताना उपलब्ध मनुष्यबळावर मोठा ताण येतो.
सण-उत्सवांमुळे वाढते आव्हान
सध्या गणेशोत्सव व आगामी विविध सण-उत्सवांच्या काळात पोलिस प्रशासनावरील जबाबदारी आणखी वाढते. सार्वजनिक गणेश मंडळे, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त बंदोबस्त द्यावा लागतो. त्याचबरोबर वरिष्ठ नेत्यांचे दौरे, शासकीय कार्यक्रम आणि बाहेरील बंदोबस्तासाठीही पोलिस कर्मचारी उपलब्ध करून द्यावे लागतात. एकीकडे शहर व तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी, तर दुसरीकडे विविध ठिकाणी बंदोबस्ताची गरज, अशा दुहेरी कात्रीत मंगरुळपीर पोलिस यंत्रणा काम करत आहे.
चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता
शहरात अलीकडच्या काळात चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. बाजारपेठ, आठवडी बाजार, बसस्थानक तसेच गर्दीच्या परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत गस्त, नाकाबंदी, संशयितांवर नजर ठेवणे, तक्रारींची चौकशी आणि गुन्ह्यांचा तपास यासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे.
मात्र, उपलब्ध कर्मचारीसंख्या मर्यादित असल्याने प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी प्रभावी पोलिस बंदोबस्त देणे हे मोठे आव्हान ठरत आहे.
आरोपांपेक्षा मनुष्यबळ वाढविण्याची गरज
पोलिसांच्या मनुष्यबळाचा प्रश्न हा केवळ पोलिस विभागाचा विषय नसून तो थेट नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केवळ पोलिसांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा मंगरुळपीर पोलिस ठाण्यासाठी आवश्यक अतिरिक्त पदे मंजूर करून घेण्यासाठी शासन व वरिष्ठ प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.
पोलिसांकडून चोख कामगिरीची अपेक्षा असतानाच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज
मंगरुळपीर तालुक्याची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या आसपास असल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ ६३ पोलिस कर्मचाऱ्यांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणे हा गंभीर प्रशासकीय प्रश्न आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने त्यांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मंगरुळपीर पोलिस ठाण्यातील मनुष्यबळाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन रिक्त पदे भरणे, अतिरिक्त पोलिस कर्मचारी उपलब्ध करून देणे आणि वाढत्या लोकसंख्येनुसार पोलिस यंत्रणेचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे.
पोलिस वाढवा, सुरक्षा मजबूत करा’
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी आवाज उठविणे ही काळाची गरज आहे. ‘आम्ही संख्येने कमी, कशी करावी हजारो जनतेची सुरक्षा?’ हा प्रश्न आज मंगरुळपीरच्या पोलिस कर्मचाऱ्यांसमोरच नव्हे, तर संपूर्ण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर उभा आहे. मंगरुळपीरला सुरक्षित ठेवायचे असेल, तर पोलिसांचे मनुष्यबळ वाढविणे ही आता केवळ गरज नव्हे, तर अत्यावश्यक बाब बनली आहे.

