LiVE NEWS | UPDATE
नवी दिल्ली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
दिल्लीतील जंतर-मंतरवरील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) शीर्ष नेते अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची अखेर पोलिसांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली आहे. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर या तिन्ही नेत्यांना वैयक्तिक मुचलक्यावर (Personal Bond) मुक्त करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी दिली आहे.
विमानामध्येच घेण्यात आले होते ताब्यात
जंतर-मंतर येथील नियोजित विरोध प्रदर्शन आंदोलनासाठी शनिवारी राजधानीत येत असताना दिल्ली विमानतळावर उतरताच कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी विमानामध्येच प्रवेश करून या तिन्ही नेत्यांना प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ताब्यात घेतले होते.

नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला २४ तासांपेक्षा जास्त वेळ विनासुनावणी ताब्यात ठेवता येत नसल्याने, रविवारी सकाळी ९ वाजता दिल्ली कॅंट पोलीस स्टेशनमध्ये कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर या नेत्यांना हजर करण्यात आले.

BNSS कलम १२६ अन्वये शांतता राखण्याची अट
कायदेशीर कारवाईबाबत माहिती देताना पक्षाच्या कायदेशीर प्रमुख रत्ना सिंह यांनी सांगितले की, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १२६ आणि १७० अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. कलम १२६ नुसार, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेनंतर संबंधित व्यक्तीला पुढील एक वर्षापर्यंत शांतता भंग न करण्याच्या अटीवर सोडले जाते. त्यानुसार तिन्ही नेत्यांनी दंडाधिकाऱ्यांसमोर वैयक्तिक मुचलक्यावर स्वाक्षरी करून एक वर्ष शांतता राखण्याची लिखित ग्वाही दिली आहे. या अटीचा भंग झाल्यास ठरलेली दंडात्मक रक्कम भरावी लागते, बॉन्ड जप्त होऊ शकतो किंवा उरलेल्या कालावधीसाठी पुन्हा कारागृहात पाठवले जाऊ शकते.

आंदोलनाची पुढील दिशा ठरणार
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील (SIR) कथित 'मत चोरी'च्या विरोधात सीजेपी आणि विविध छात्र-युवा संघटनांचे आंदोलन अधिक आक्रमक झाले आहे. शनिवारी हजारो निदर्शकांना ताब्यात घेऊनही सीजेपीने माघार घेण्यास नकार दिला होता.

आता सुटकेनंतर दुपारी २ वाजता कॉकरोच जनता पार्टी (CJP) पत्रकार परिषद घेणार असून, या पत्रकार परिषदेत पक्षाची पुढील रणनीती आणि आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.