७० टक्के मेगाभरतीसह प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी
LiVE NEWS | UPDATE
पुणे | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

राजगुरुनगर | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लढ्याला स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेने जाहीर पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने राजगुरुनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी संबंधित विवेक भीमनवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी केली.


७० टक्के मेगाभरती तातडीने करा

शासकीय पदांची भरती रखडल्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. त्यामुळे ७० टक्के मेगाभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होत असताना भरती प्रक्रियेला होणारा विलंब त्यांच्या अडचणींत भर घालत आहे. शासनाने भरती प्रक्रियेला गती देऊन विद्यार्थ्यांना लवकरात लवकर संधी उपलब्ध करून द्यावी, असे MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी श्री. भोडवे यांनी सांगितले.


पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी उपस्थिती

या आंदोलनात स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्याध्यक्ष हरेशभाई देखणे, राज्य उपाध्यक्ष अलका गुंजाळ, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी, जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ पाटोळे, गगनभरारी अकॅडमीचे प्रमुख अशोक वंजारी सर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील गायकवाड यांनी सहभागी होत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी खेड तालुकाध्यक्ष सोमनाथ लोंढे, सरचिटणीस हेमंत पाटोळे, स्वप्नील काचोळे, श्री. भोडवे यांच्यासह MPSC चे विद्यार्थी, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.


या आंदोलनाचे आयोजन स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष कैलास केदारी यांनी केले होते.