केंद्र सरकारच्या आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती, पीक नुकसान आणि पाणीटंचाईचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पथकाने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि व्यथा जाणून घेण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ११ सदस्यीय आंतरमंत्रालयीन पथक नियुक्त केले आहे. या पथकात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग तसेच नीती आयोगाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय पथकातील अर्जेश कुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे आदी उपस्थित होते.

पावसाची कमतरता, पीक नुकसान आणि पाणीटंचाईवर चर्चा
बैठकीत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचे सादरीकरण केले. पावसाची कमतरता, शेतीपिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, संभाव्य टँकरची गरज आणि जनावरांच्या चाऱ्याची स्थिती याबाबत केंद्रीय पथकाला माहिती देण्यात आली. तसेच शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजुरांसमोरील अडचणी, मजुरांच्या संभाव्य स्थलांतराचा प्रश्न आणि आगामी सात महिन्यांतील परिस्थितीचा अंदाज यावरही चर्चा करण्यात आली.
विभागातील जलस्रोत, तलाव आणि गावांमधील पाण्याच्या उपलब्धतेची सद्यःस्थिती याचाही पथकाने आढावा घेतला. कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सूत्रसंचालन केले.
वाशिम जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी
बैठकीनंतर केंद्रीय पथकाने वाशिम जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. या दौऱ्यात पथकाने पुढील ठिकाणी भेटी दिल्या.
- सुपखेला, ता. वाशिम : दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेताला भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.
- स्वासिन, ता. मंगरूळपीर : येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करून परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात आला.
- कोठारी, ता. मंगरूळपीर : दिलीप दुबळगुंड यांच्या शेताची पाहणी करण्यात आली.
- कुपटा, ता. मानोरा : मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या शेतातील पीक नुकसानीची पाहणी करण्यात आली.
काळीकारंजा, ता. कारंजा : त्र्यंबक फकिरा गुल्हाने यांच्या शेताला भेट देण्यात आली.
- पानविहीर, ता. कारंजा : रमेश भाऊराव थेर यांच्या शेताची पाहणी करून पीक नुकसानीची माहिती घेण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीपिकांचे झालेले नुकसान, पाणीटंचाई आणि उपलब्ध संसाधनांची स्थिती यांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यावर पथकाने भर दिला.
केंद्र सरकारकडे सादर होणार पाहणीचा अहवाल
केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणीदरम्यान मिळालेली माहिती, पीक नुकसानीची स्थिती, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या पाहणीच्या निष्कर्षांच्या आधारे केंद्र सरकारसमोर परिस्थितीचा अहवाल मांडला जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पाहणी पूर्ण केल्यानंतर केंद्रीय पथक यवतमाळ जिल्ह्याकडे रवाना झाले.

