राज्य शासनाच्या वतीने वाशिम जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमाद्वारे कृषी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी तसेच शेताच्या बांधावर जाऊन अधिकारी दीपप्रज्वलन करीत असून, योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती जाणून घेत आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना’ आणि ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना’ यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरीकर यांच्या नियोजनातून पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे.वाशिम तालुक्यातील सोयता-भोयता शिवारातील जिजाबाई नत्थूजी मेंडके यांना ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये विहिरीचा लाभ मिळाला. कृषी विस्तार अधिकारी वैशाली गावंडे यांनी त्यांच्या शेतावर भेट देऊन दीपप्रज्वलन केले.रिसोड तालुक्यातील चिखली येथील पांडुरंग लुडोजी भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने’अंतर्गत नवीन विहिरीचा लाभ मिळाला असून, कृषी विस्तार अधिकारी आशिष मुळे यांनी त्यांच्या शेतावर दीपप्रज्वलन केले.मानोरा तालुक्यातील खंबाळा येथील सुनिता अरुण झळके यांना ‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने’अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये नवीन विहिरीचा लाभ मिळाला. या विहिरीमुळे उत्पन्नात भरीव वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र चिंतावार यांनी त्यांच्या घरी भेट देऊन दीपप्रज्वलन केले.याच धर्तीवर मंगरूळपीर, कारंजा आणि मालेगाव तालुक्यांतही लाभार्थ्यांच्या घरी व शेतावर भेटी देण्यात आल्या.
शेतीला हक्काचे पाणी, उत्पन्नात वाढ
शेतीला हक्काचे पाणी उपलब्ध झाल्याने उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक परिस्थिती व राहणीमानात सकारात्मक बदल झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. ‘आशीर्वादाचा दिवा’ उपक्रमातून कृषी योजनांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या जीवनात घडवून आणणारा बदल आणि प्रशासन व शेतकरी यांच्यातील थेट संवाद अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.

