LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय समीकरणांना अचानक कलाटणी मिळाली आहे. छाननी प्रक्रियेत तब्बल सात उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, त्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांचा समावेश आहे. दुसरीकडे खासदार विशाल पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिकच रंगण्याची चिन्हे आहेत.

आमदार सुरेश खाडे यांनी सेवा सोसायटी गटाबरोबरच अनुसूचित जाती-जमाती गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या सभासदत्वाचा कालावधी तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवर हरकत घेण्यात आली होती. सुनावणीनंतर दोन्ही अर्ज अवैध ठरल्याने खाडे सध्या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर गेले आहेत. या निर्णयाविरोधात पुढील कायदेशीर भूमिका काय घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांच्या मिरज सोसायटी गटातील अर्जावरही सभासदत्वाचा कालावधी आणि कागदपत्रांबाबत हरकत घेण्यात आली होती. हा अर्ज अवैध ठरला. मात्र, महिला राखीव तसेच नागरी बँका व पतसंस्था गटातील त्यांचे अर्ज वैध ठरल्याने त्यांची उमेदवारी अद्याप कायम आहे.

पडळकरांचा अर्ज वैध; आव्हानाची तयारी

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारी अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी हरकत घेतली होती. पडळकर यांच्या सभासदत्वासह अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरही आक्षेप नोंदविण्यात आला. मात्र, सुनावणीनंतर संबंधित हरकती फेटाळण्यात आल्याने पडळकरांचा अर्ज वैध ठरला आहे.

दरम्यान, पडळकरांचा अर्ज बनावट कागदपत्रांच्या आधारे पात्र ठरवल्याचा आरोप करत या निर्णयाला कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्याची तयारी सावंत आणि शिंदे यांनी दर्शविली आहे.

खासदार विशाल पाटील यांच्या संचालकपदाच्या दहा वर्षांच्या कालावधीबाबतही हरकत घेण्यात आली होती. मात्र, ही हरकत फेटाळण्यात आल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला. या निर्णयाविरोधात आमदार सुरेश खाडे यांनीही कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याचे संकेत दिले आहेत.

आमदार सत्यजित देशमुख आणि अनिता सगरे यांच्या उमेदवारी अर्जांवर बँकेचे थकबाकीदार असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. मात्र, संबंधित हरकतींत तथ्य आढळले नसल्याने दोघांचेही अर्ज वैध ठरले.

२१ जागांसाठी २९५ अर्ज

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी तब्बल २९५ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. आता २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या माघारी प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रमुख नेत्यांसह विविध गटांतील दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

छाननीनंतर अवैध ठरलेले सात अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. आमदार सुरेश खाडे, पूजा विशाल पाटील, शिल्पा शिवाजी पाटील, अर्जुन नेताजी कांबळे, महादेव रामाण्णा अंकलगी, किसान गणपती जानकर आणि रामचंद्र सरगर.

कोणत्या गटात किती अर्ज?

मतदारसंघ जागा अर्ज
सेवा सोसायटी १०. ६०
महिला राखीव १. १६
महिला खुला १. ३९
अनुसूचित जाती-जमाती १. २८
इतर मागासवर्गीय १. २१
भटक्या जमाती १. २६
इतर शेती संस्था १. १४
प्रक्रिया संस्था  १. १६
नागरी बँका व पतसंस्था २. ४२
मजूर संस्था  २. ३३
छाननीत काही दिग्गजांना धक्का बसला असला तरी निवडणुकीचे खरे चित्र माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे २१ ऑक्टोबरची माघार प्रक्रिया जिल्हा बँकेच्या राजकीय रणधुमाळीतील निर्णायक टप्पा ठरणार आहे.