अन्याय सहन करणार नाही ; उमेश गुजर ; भ्रष्ट व नराधम अधिकाऱ्यांना सोडणार नाही  ; अश्विनीताई पाटील
LiVE NEWS | UPDATE
सातारा | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाय.सी. कॉलेजमधील कथित बेकायदेशीर वसुली, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, महिलांवरील अन्याय आणि कराड परिसरातील अवैध धंद्यांविरोधात सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी प्रतिनिधी उमेश गुजर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला तीन दिवस उलटूनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, रात्री पावणे एकच्या सुमारास आंदोलनस्थळी दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘अन्यायाविरुद्धचा लढा सुरूच ठेवणार,’ असा निर्धार उमेश गुजर यांनी व्यक्त केला. या आंदोलनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी सुरज गडगे, अनिल वीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून कथित बेकायदेशीर वसुलीचा आरोप

वाय.सी. कॉलेजमध्ये गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांकडून कागदपत्रांच्या नावाखाली मोठ्या रकमेची बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांची कथित आर्थिक लूट तातडीने थांबवावी, प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अश्विनीताई पाटील यांचे पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

अश्विनीताई वेताळ पाटील यांनीही अवैध धंदे, महिलांच्या तक्रारींकडे होणारे कथित दुर्लक्ष आणि आपल्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केले आहे. वाय.सी. कॉलेजमधील कथित बेकायदेशीर वसुली, अवैध धंदे आणि महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवल्यामुळे कॉलेज प्रशासन व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्यावरील सर्व गुन्हे बिनशर्त मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यावर महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणे, तक्रारदारांना दमदाटी करणे आणि अवैध धंद्यांना अभय देणे, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या कथित जाचामुळे सुमारे सहा पीडित महिला व मुलींना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अश्विनीताई पाटील यांना धमक्या देण्यात आल्याचा, त्यांना उपचारांपासून वंचित ठेवून त्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याचा आणि त्यांच्या मोबाइलमधील महत्त्वाचे पुरावे हटविल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

प्राध्यापकावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी

वाय.सी. कॉलेजमधील प्रा. अर्जुन भिंगारदिवे यांच्यावर विद्यार्थिनी व महिलांचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फ करून लॅपटॉप व मोबाइलमध्ये ठेवल्याचा, त्याद्वारे ब्लॅकमेल केल्याचा तसेच तक्रारदार महिलांचा पाठलाग करून धमकावल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या आरोपांची चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना साकडे

कराड शहर पोलीस ठाण्याच्या परिसरासह कराड व आसपासच्या भागात अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या धंद्यांना पोलीस निरीक्षक दराडे यांचे कथित पाठबळ असून त्यामागे हप्तेखोरी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्ह्यात जिथे अवैध धंदे आढळतील, तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. रात्रीच्या दगडफेकीच्या कथित घटनेची चौकशी करून आंदोलनस्थळी पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटना, पीडित महिला, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि नागरिकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.