LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सोने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेच्या सोन्याच्या बांगड्यांवर रासायनिक प्रक्रिया करून सोने लंपास करणाऱ्या बिहारमधील दोन आरोपींना मिरज शहर पोलिसांनी अटक केली आहे. दुर्गेशकुमार कृष्णकुमार गुप्ता (वय २७) आणि देवेंद्रकुमार नरेशप्रसाद गुप्ता (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे तीन लाख रुपये किमतीची १८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि रासायनिक पदार्थ असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
विश्वास संपादन करून बांगड्यांवर रासायनिक प्रक्रिया
 
मिरज शहरातील मंगळवार पेठ, माळी गल्ली येथे १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महादेवी शिवराम मोदगे (वय ६४) या घरी एकट्याच असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी आल्या. घरातील पितळेची भांडी पॉलिश करण्यासाठी पावडर विकत असल्याचे सांगून त्यांनी भांडी पॉलिश करून दिली. त्यानंतर सोन्याच्या बांगड्याही पॉलिश करून देण्याचे आमिष दाखवून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला.
 
महिलेने ६० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्यासाठी दिल्या. आरोपींनी पाणी आणि पिवळ्या रंगाचे रसायन असलेल्या भांड्यात बांगड्या टाकून प्रक्रिया केली. काही वेळानंतर बांगड्या बाहेर काढून त्या थोड्या वेळाने वापरण्यास सांगत आरोपी तेथून निघून गेले.
 
सोन्याचे वजन कमी झाल्याने फसवणूक उघड
 
काही वेळाने बांगड्या घालण्यासाठी घेतल्या असता त्यांची जाडी आणि वजन कमी झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने सराफाकडे जाऊन बांगड्यांचे वजन केले. त्यावेळी बांगड्यांचे वजन ६०.०७० ग्रॅमवरून ४१.६८४ ग्रॅम झाल्याचे स्पष्ट झाले. रासायनिक प्रक्रियेद्वारे सुमारे १८.३८६ ग्रॅम सोने लंपास केल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
३० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींना पकडले
 
गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहरातील सुमारे ३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी स्टेशन चौक परिसरात आल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान गुन्ह्यातील सहभाग उघड झाल्यानंतर त्यांना ९ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली.
 
ही कारवाई सांगलीचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण चौगूले व त्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविकुमार सोलनकर करीत आहेत.
 
दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने विशेषतः वृद्ध महिलांना लक्ष्य केले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून सोन्या-चांदीचे दागिने त्यांच्या ताब्यात देऊ नयेत. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा डायल ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मिरज शहर पोलिसांनी केले आहे.