LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

मिरज रेल्वे स्टेशन चौक परिसरातील सलूनमध्ये चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीकडील २५० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. अल्ताफ ऊर्फ हटेला अन्वर शेख (वय २२, रा. ख्वॉजा बस्ती, मिरज) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर खंडाप्पा कांबळे (रा. प्रताप कॉलनी झोपडपट्टी, मिरज) हे ७ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास मिरज रेल्वे स्टेशन चौकातील अरविंद हेअर कटिंग सलूनमध्ये दाढी करण्यासाठी गेले होते. यावेळी संशयित अल्ताफ शेख याने त्यांना चाकूचा धाक दाखवून गंभीर दुखापत करण्याची भीती घातली आणि त्यांच्याकडील २५० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.


या घटनेची माहिती ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उशिरा महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हा क्रमांक ३०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.


गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पकडले

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तपास पथकाला घटनास्थळावरील तांत्रिक माहिती संकलित करून आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तसेच फिर्यादीकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, अल्ताफ शेख हा मिरज रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करून ९ ऑक्टोबर रोजी रात्री त्याला ताब्यात घेतले. फिर्यादीकडून खात्री केल्यानंतर त्यानेच चाकूचा धाक दाखवून पैसे हिसकावल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


यापूर्वी एक वर्षासाठी केले होते हद्दपार

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्ताफ ऊर्फ हटेला शेख याच्यावर शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे २०२५ मध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये त्याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले होते. तरीही त्याच्याविरुद्ध आता जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.


पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि मिरज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजीत धनगर, पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, मोसिन टिनमेकर, राजेंद्र हारगे आणि चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे करीत आहेत.


सराईत गुन्हेगारांच्या हालचालींबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.