विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; भाषणे, जनजागृतीपर नाटिकेतून मानसिक आरोग्याचा संदेश
LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, वाशिम येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वसंतराव धाडवे होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक अझहर सर, रोहन सर, श्रेया मॅडम आणि प्रवीण वानखेडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फ्लॉरेन्स नाइटिंगेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. वसंतराव धाडवे यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, मानसिक तणावाचे व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनात मानसिक स्वास्थ्य जपण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अनावश्यक तणाव न घेता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन सर यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे, मानसिक समस्यांकडे संवेदनशीलतेने पाहणे आणि गरज पडल्यास योग्य मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मानसिक आरोग्य दिनानिमित्त पायल बनसोडे, अंकिता राठोड, श्रुती जंगाडे आणि पल्लवी गिरी या विद्यार्थिनींनी भाषणे सादर केली. आपल्या मनातील भावना व्यक्त करणे, तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे आणि मानसिक स्वास्थ्य जपणे याबाबत त्यांनी विचार मांडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य या विषयावर आधारित जनजागृतीपर नाटिका सादर केली. या नाटिकेत स्वाती राठोड, साज चव्हाण, पूजा चव्हाण, ट्विंकल राठोड, प्रतीक्षा राठोड, निकिता चव्हाण आणि नंदिनी चव्हाण यांनी सहभाग घेतला. मानसिक समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, गरजेनुसार मदत घेणे आणि मानसिक आरोग्याबाबत गैरसमज दूर करणे, हा संदेश नाटिकेतून देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याबाबत जागरूक राहण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी इंगोले आणि स्वाती राठोड यांनी केले, तर आदित्य भगत आणि रुद्रेश्वर राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले.

