आश्वासन पाळा, अन्यथा ३० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण

महानगरपालिका प्रशासनाने नवीन नामफलक १५ दिवसांत तयार करून बसविण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत नामफलक बसविण्यात आला नाही आणि परिसराची नियमित स्वच्छता राखली गेली नाही, तर येत्या ३० नोव्हेंबर २०२६ पासून महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्याचे नेते तुषार खांडेकर व इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी दिला आहे.

LiVE NEWS | UPDATE

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश; महानगरपालिकेचे लेखी आश्वासन, आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्गावरील जीर्ण झालेला नामफलक नव्याने तयार करून बसविण्याची कार्यवाही महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. नवीन नामफलक तयार करण्यासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, प्रशासनाने दिलेल्या मुदतीत नामफलक बसविण्याची कार्यवाही पूर्ण न झाल्यास येत्या ३० नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशारा आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना, सांगली जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे.

मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौकात ‘लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्ग’ असा नामफलक आहे. मात्र, सदर फलकाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. त्यावर धूळ व माती साचली होती, तर अक्षरेही फिकट व अस्पष्ट झाल्याने नागरिकांना नामफलक व्यवस्थित वाचता येत नव्हता. महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असलेल्या मार्गाच्या नामफलकाची अशी दुरवस्था झाल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्या वतीने दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी निवेदन देण्यात आले होते. नामफलकाचे नूतनीकरण, सुशोभीकरण, रंगरंगोटी आणि परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ठिय्या आंदोलन व अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला होता.

या निवेदनाची दखल घेत महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रभाग समिती क्रमांक ४, मिरज यांच्याकडून दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी लेखी उत्तर देण्यात आले. उपअभियंता महेश मदने यांनी दिलेल्या पत्रानुसार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मार्गावरील नवीन नामफलक तयार करण्यात येत असून, त्यासाठी साधारण १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. हा नामफलक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बसविण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.

तसेच परिसराची स्वच्छता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळोवेळी करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य स्वच्छता अधिकाऱ्यांनाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संघटनेच्या वतीने प्रशासनाच्या लेखी आश्वासनाचे स्वागत करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी आम्ही आंबेडकरवादी संघटनेचे नेते तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, अरविंद कुरणे, सुलेमान मुजावर, उमेश धेंडे, कपिल कबाडगे, सागर आवळे, सचिन मोरे, जयंत मगरे, परशुराम बनसोडे, अविनाश भोरे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.