LiVE NEWS | UPDATE

सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज | प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेली घरकुले तातडीने सुरू करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी लाभार्थ्यांना केले. मंजुरी मिळूनही घरकुलांचे बांधकाम सुरू न करणाऱ्या लाभार्थ्यांनी ऑक्टोबरअखेरपर्यंत काम सुरू करावे; अन्यथा संबंधित मंजूर घरकुलांची मंजुरी रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
नरवाडे यांनी सोमवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी बेडग आणि आरग ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर घरकुलांच्या कामांचा आढावा घेतला. यावेळी आरग येथील ६५८, तर बेडग येथील ४४८ लाभार्थ्यांच्या घरकुलांचा आढावा घेण्यात आला.

घरकुल मंजूर होऊनही अद्याप प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात न केलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेण्यात आली. अशा लाभार्थ्यांना तातडीने नोटिसा बजावून बांधकाम सुरू करण्याबाबत सूचना देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

“घरकुलासाठी शासनाकडून निधी व मंजुरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता बांधकाम सुरू करावे. ऑक्टोबरअखेरपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास मंजूर घरकुले रद्द करण्याची कार्यवाही केली जाईल,” असा स्पष्ट इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिला.

घरकुल योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावा आणि मंजूर घरकुलांची कामे प्रत्यक्षात पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी प्रशांत जगताप, संदीप कोटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.