वाशिम तालुक्यात अवैध सावकारी व्यवसायासंदर्भात प्राप्त तक्रारीच्या चौकशीदरम्यान सहकार विभागाने दोन महिलांच्या निवासस्थानी झडती घेतली. या झडतीत अनेक धनादेश, कोरे मुद्रांक आणि सावकारी व्यवहारांशी संबंधित अभिलेख आढळून आले. या प्रकरणी सागर उर्फ प्रिया दौलतराव वायचाळ आणि अल्का दौलतराव वायचाळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ अंतर्गत वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती सहकार विभागाने गुरुवारी दिली.
तक्रारीनंतर दोन्ही निवासस्थानी झडती
सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलम ९६ अन्वये ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. सागर उर्फ प्रिया वायचाळ आणि अल्का वायचाळ यांच्या राजगड (ता. जि. वाशिम) येथील मूळ निवासस्थानी तसेच वाशिम शहरातील बाबा रोड, लाखाळा परिसरातील सध्याच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली.
अनेक सावकारी व्यवहार उघडकीस
झडतीदरम्यान जप्त करण्यात आलेल्या अभिलेखांची तपासणी केली असता, अर्जदार आणि गैरअर्जदार यांच्यात अनेक सावकारी व्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले. संबंधितांकडून अवैध सावकारी केली जात असल्याचेही प्राथमिक तपासात आढळून आले. यावेळी असंख्य धनादेश आणि कोरे मुद्रांक घेतल्याचेही समोर आले.
वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी ईश्वर नारायण काबरा यांना प्राधिकृत करण्यात आले होते. त्यानुसार ६ ऑक्टोबर रोजी वाशिम शहर पोलिस ठाण्यात एफआयआर क्रमांक १०५९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ मधील कलम ३९ आणि ४५ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
अवैध सावकारीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील नागरिकांनी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या व्यक्तींच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. अवैध सावकारी व्यवहारांबाबत नागरिकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालय किंवा संबंधित तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे निनावी अथवा गोपनीय स्वरूपात तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असे उपनिबंधक कार्यालय, वाशिम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

