कोरडा दुष्काळ जाहीर होऊन एक महिना उलटूनही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अपेक्षित मदत व उपाययोजना अद्याप मिळालेल्या नाहीत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला असून, आगामी रब्बी हंगामासमोरही मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन बापू देशमुख यांनी केला.
शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंतची भरीव मदत मिळेपर्यंत शिवसेनेचे आंदोलन सुरूच राहणार, असा ठाम निर्धार आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केला. याच मागणीसाठी येत्या ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वनोजा-शेलूबाजार परिसरातून जाणाऱ्या विदर्भ समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी २५ ऑक्टोबर रोजी शेलूबाजार येथील श्री साई श्रद्धा संस्थान येथे शिवसेनेच्या वतीने नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार नितीन बापू देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांप्रती शासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, खरीप हंगाम हातातून गेला आहे. आता रब्बी हंगामासाठी पाणी, बियाणे, खते व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यामुळे ३० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार नितीन बापू देशमुख यांनी केले.

