महागड्या बियाण्यांच्या खर्चाला पर्याय शोधताना शेतकऱ्यांचा पारंपरिक बियाणे जपण्यावर भर
बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीच्या खर्चामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यातच सोयाबीनला आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांसमोर एक वेगळाच विचार उभा राहिला आहे. आज बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळत असताना ते विकून टाकायचे की पुढील हंगामासाठी स्वतःच्याच शेतातील चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे म्हणून राखून ठेवायचे? या विचारातून आता काही शेतकरी बियाणे बचतीचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत.
जांब येथील शेतकरी संतोष अंभोरे यांनी याच विचारातून आपल्या शेतातील सोयाबीन पुढील पेरणीसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते सध्या सोयाबीनची प्रतवारी करीत असून, चांगल्या दर्जाचे, निरोगी आणि भरदार दाणे निवडून वेगळे ठेवण्याचे काम करीत आहेत.
सध्या बाजारात सोयाबीनला आठ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याने किलोमागे ८० रुपये दराने सोयाबीन विकण्याची संधी शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र, दुसरीकडे पेरणीच्या हंगामात नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांचे दर दुप्पट-तिप्पट वाढल्यास शेतकऱ्यांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे बाजारात सोयाबीन विकून पुन्हा महागडे बियाणे खरेदी करण्यापेक्षा स्वतःच्या शेतातील चांगले सोयाबीन निवडून त्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे अधिक फायदेशीर ठरू शकते, असा विचार शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
बियाण्यांसाठी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न
शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता पुढील हंगामाचे नियोजनही आतापासून करणे गरजेचे आहे. स्वतःच्या शेतातील चांगल्या व शुद्ध वाणाचे सोयाबीन निवडून त्याची प्रतवारी करणे, उगवणक्षमता तपासणे आणि योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास बियाण्यांवरील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, पेरणीपूर्वी बियाण्याची उगवणक्षमता तपासणे आणि बीजप्रक्रिया करणे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.
संतोष अंभोरे यांचा हा प्रयत्न केवळ बियाणे राखून ठेवण्यापुरता मर्यादित नसून, वाढत्या शेती खर्चावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या पातळीवर शोधलेला आर्थिक बचतीचा मार्ग आहे. बाजारभावाचा लाभ घेतानाच पुढील हंगामातील खर्च कमी करण्याचे नियोजन करणारा हा उपक्रम परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही विचार करायला लावणारा ठरत आहे.
भाव मिळाला म्हणून सर्वच सोयाबीन विकायचे असे नाही; पुढील हंगामातील पेरणीचा विचार करून काही सोयाबीन बियाण्यासाठी राखून ठेवणे, हाच शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचा नवा मंत्र ठरत आहे!

