मंगरूळपीर-वाशिम मार्गावर दोन महिंद्रा पिकअप पकडल्या; ८ गोवंश जनावरांची सुटका, १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखेची कळंबा फाटा परिसरात धडक कारवाई

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात वाशिम पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगरूळपीर-वाशिम मार्गावर पहाटेच्या सुमारास सापळा रचून दोन महिंद्रा पिकअप वाहने पकडली. या वाहनांमधून निर्दयतेने वाहतूक करण्यात येत असलेल्या ८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवाईत दोन्ही वाहनांसह एकूण अंदाजे १३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी जिल्ह्यातील अवैध गोवंश वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, १४ नोव्हेंबर रोजी मंगरूळपीर ते वाशिम मार्गावरून दोन महिंद्रा पिकअप वाहनांतून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंबा फाटा परिसरात सापळा रचला.

पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन क्रमांक MH 37 T 1962 आणि MH 03 CP 5885 ही वाहने अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबून ठेवल्याचे आढळून आले. जनावरांच्या वाहतुकीदरम्यान चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय कत्तलीच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या कारवाईत एकूण ८ बैल/गोवंश जनावरे आणि दोन महिंद्रा पिकअप वाहने असा अंदाजे १३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांची नावे निष्पन्न केली आहेत. त्यामध्ये मोहम्मद फैजान मोहम्मद जावेद (वय २८, रा. दर्गा चौक, बढाईपुरा, मंगरूळपीर, जि. वाशिम) आणि जावेद अहमद अब्दुल रऊफ (वय ४५, रा. टाकळीपुरा, मंगरूळपीर) यांचा समावेश आहे. या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी हे प्रकरण असोलगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची धडाकेबाज कामगिरी

पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस निरीक्षक सुधाकर आढे, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पोलीस उपनिरीक्षक शेखर मास्कर तसेच पोलीस अंमलदार विठ्ठल महाले, तुषार ठाकरे आणि संदीप दुतोंडे यांनी ही कारवाई केली.

जिल्ह्यात अवैध कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून, अशा बेकायदेशीर हालचालींबाबत नागरिकांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांच्याकडून करण्यात आले आहे.