कौटुंबिक वादातून रक्तरंजित थरार; उत्तर प्रदेशातील ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना
LiVE NEWS | UPDATE
सांगली | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
मिरज तालुक्यात खुनाचे सत्र सुरूच असून, बेळंकी येथे कौटुंबिक वादातून साडूनेच आपल्या साडूची लाकडी दांडक्याने डोक्यात बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेशकुमार गौतम ब्रिजलाल (वय ३५, रा. बैरवी, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाले. दरम्यान, खून केल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी मिरज ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके रवाना झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महेशकुमार ब्रिजलाल आणि त्याचा साडू हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील असून, कामानिमित्त मिरज तालुक्यातील बेळंकी येथे वास्तव्यास होते. बेळंकी येथील लिमये मळा परिसरात ते शेतमजूर म्हणून काम करीत होते.
शुक्रवारी रात्री दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून जोरदार वादावादी झाली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांमध्ये हाणामारीदेखील झाली. याच दरम्यान संतापलेल्या साडूने महेशकुमार ब्रिजलाल याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला महेशकुमार ब्रिजलाल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर संशयित आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे, मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, हत्या करून पसार झालेल्या संशयित आरोपीच्या शोधासाठी मिरज ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचे समोर येत असले, तरी हत्येमागचे नेमके कारण संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते.

