LiVE NEWS | UPDATE
वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क
वाशिम जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे नियोजनबद्ध आणि समन्वयाने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत. जलसाठ्यांची क्षमता वाढविणे, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचे शाश्वत नियोजन करण्यासाठी शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, सीएसआर भागीदार आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 
मृद व जलसंधारण विभागामार्फत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये एकूण ६३.०२ कोटी रुपये खर्चाची ३५५ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये ३९.३३ कोटी रुपयांची १७४ तलावांतील गाळ उपशाची कामे, २१.०४ कोटी रुपयांची १७६ नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे आणि २.६५ कोटी रुपयांचे पाच सिमेंट साठवण बंधारे प्रस्तावित आहेत.
 
तलावांमधून सुमारे ३२.५ लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन असून, त्यामुळे ३.२५ दशलक्ष घनमीटर जलसाठा क्षमता पुनर्स्थापित होण्यास मदत होणार आहे. तसेच सुमारे ८ हजार १०० एकर शेतजमिनीला सुपीक गाळ उपलब्ध होणार आहे.
 
पावसाची तूट; भूजल पातळीत घट
 
जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ४८५.७८ मि.मी. पाऊस झाला. हे प्रमाण सरासरीच्या ६२.६३ टक्के असून, पावसात ३७.३७ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७९ निरीक्षण विहिरींपैकी ७७ विहिरींच्या भूजल पातळीत सरासरी १.११ मीटरने घट झाली आहे. तसेच ३४ पाणलोट क्षेत्रांतील २४७ गावे संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून दर्शविण्यात आली आहेत.
 
स्वयंसेवी संस्था आणि सीएसआरचा सक्रिय सहभाग
 
जलसंधारणाच्या कामांना गती देण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि सीएसआर भागीदारांचाही सहभाग घेतला जात आहे.
 
बायफ आणि टाटा ट्रस्ट्स यांच्या सहकार्याने मालेगाव तालुक्यातील १५ गावांमध्ये पाणलोट व पशुधन विकासासाठी १.३२ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे. एएफपीआरओ आणि आयटीसी यांच्या 'मिशन सुनहरा कल' उपक्रमातून जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील २१ गावांमध्ये ५७ जलसंधारण कामे प्रस्तावित आहेत. तसेच वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) आणि एचडीएफसी यांच्या सहकार्याने मालेगाव तालुक्यातील २० गावांमध्ये विदर्भ जलसंवर्धन प्रकल्पांतर्गत कामांचे नियोजन करण्यात आले आहे.
 
विविध संस्थांच्या कार्यक्षेत्रांचा गावनिहाय संयुक्त नकाशा तयार करून कामांचे स्पष्ट वाटप करावे. ग्रामपंचायतीचे ठराव, जलसाठानिहाय सविस्तर प्रकल्प अहवाल, आवश्यक मान्यता, कामापूर्वीचे जिओटॅगिंग आणि कामांच्या प्रगतीची नियमित नोंद ठेवावी. प्रस्तावित जलसंधारणाची कामे आगामी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभोजकर यांनी दिले.
 
एकूणच, पावसाची तूट आणि खालावणारी भूजल पातळी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या माध्यमातून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.