#वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पोलीस चौकीला लागून असलेल्या सोमानी टेलिकॉमच्या सिगारेट एजन्सीच्या गोडाऊनचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही सोबत नेला. पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सोमानी टेलिकॉमची सिगारेट एजन्सी आहे. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एजन्सीचे लॉक आणि शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर विविध कंपन्यांच्या सिगारेटसह इतर साहित्य चारचाकी वाहनांमध्ये भरून चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी एजन्सीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरून नेला. सकाळी दुकान उघडण्यासाठी कर्मचारी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत अंदाजे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पोलीस चौकीपासून अगदी जवळ ही चोरी झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी शेजारील पोलीस चौकीत कर्मचारी उपस्थित नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी पोलीस चौकीत नियमित कर्मचारी तैनात ठेवावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. या धाडसी चोरीचा छडा लावून चोरट्यांना पोलिस कधी जेरबंद करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

