भारतमातेच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचा अभिमान; फुलांच्या वर्षावात वीर जवानाचे जल्लोषात स्वागत

LiVE NEWS | UPDATE

वाशिम | महाराष्ट्र दणका न्युज नेटवर्क

भारतमातेच्या रक्षणासाठी सलग १६ वर्षे भारतीय सैन्यात सेवा बजावत देशाच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे मंगरूळपीर तालुक्यातील येडशी कुंड येथील सुपुत्र नायक महादेव मारोती सावंत हे सैन्यसेवेतून सेवानिवृत्त होऊन मायभूमीत परतले. यानिमित्त शेलूबाजार नगरीत त्यांचे जंगी स्वागत करून देशसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थिती, ऊन, वारा, पाऊस आणि अनेक आव्हानांचा सामना करीत १६ वर्षे अखंडपणे देशसेवेचे पवित्र कर्तव्य बजावणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. आपल्या आयुष्यातील अनमोल सोळा वर्षे देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित करणाऱ्या नायक महादेव सावंत यांच्या त्यागाचा, शौर्याचा, जिद्दीचा आणि देशभक्तीचा परिसरातील नागरिकांनी गौरव केला.

शेलूबाजार येथे त्यांच्या आगमनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत करून त्यांच्याप्रती आदर आणि सन्मान व्यक्त केला. एका सैनिकाच्या सेवेमागे त्याचे कुटुंब, त्याग आणि देशाप्रती असलेली निष्ठा दडलेली असते. त्यामुळे महादेव सावंत यांचा हा सन्मान म्हणजे केवळ एका जवानाचा गौरव नसून भारतीय सैन्यदलातील प्रत्येक जवानाच्या समर्पणाला दिलेली मानवंदना आहे.

सैन्यसेवेतून निवृत्ती म्हणजे देशसेवेचा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. नायक महादेव सावंत यांची १६ वर्षांची देशसेवा येणाऱ्या पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.