पंचायत समितीत आढावा बैठक; संभाव्य पाणीटंचाईवर ठोस उपाययोजनांचे अधिकाऱ्यांना निर्देश
आगामी काळात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार श्यामभाऊ खोडे यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पंचायत समिती मंगरूळपीर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील संभाव्य टंचाईची परिस्थिती, पाणीपुरवठ्यातील अडचणी आणि आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये, तसेच कोणत्याही गावात पाणीटंचाईमुळे गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे, अशा सूचना आमदार खोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणीटंचाई ही केवळ प्रशासकीय समस्या नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित मूलभूत गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याबाबतच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घ्यावी. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची माहिती संकलित करावी, आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून नागरिकांना दिलासा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या मूलभूत गरजांना सर्वोच्च प्राधान्य देत पाणीटंचाईवर केवळ तात्पुरत्या नव्हे, तर परिणामकारक उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून संभाव्य पाणीटंचाईचा प्रश्न प्रभावीपणे हाताळण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी रवींद्र काळे, तहसीलदार सुधाकर अनासुने, गटविकास अधिकारी सारिका कारले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

